गावाकडच्या माणसांची
नाळ मातीशी तुटत नाही,
शहरातल्या मातीला
गंध आपुलकीचा वाटत नाही...
कानी पडत नाही पक्ष्यांचा किलबिलाट
दिसेनाशी होई शेतामध्ये जाणारी पायवाट,
कोंबड्यांच्या बागेने तांबडं फुटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
बंद बंद असती फ्लॅटची दारं
मिळेनासं होई उनाडं वारं,
मायेचे धुकं इथं दाटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
ना चुलीवरची भाकर
ना जीभेवर साखर,
एकाच्या दु:खाने दुसऱ्याचे काळीज फाटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
शहरात काळजाला पडतात चरा
शहरापेक्षा गड्या आपुला गाव बरा
माणूसकीचा झरा कधी आटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..!